नागपूर : देशाच्या काही राज्यांमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला, पण महाराष्ट्रातील त्याचा मुक्काम ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागानेच राज्यातील परतीच्या पावसाची तारीख वाढल्याचे सांगितले आहे.
राज्याच्या काही भागांत एक ऑक्टोबरपर्यंत मध्यम तर, काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देईल असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरांमधील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. तर, अधूनमधून विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट असे चित्रही शहरातील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढच्या किमान दहा दिवसांसाठी शहरात आणि शहराला लागून असणाऱ्या उपनगरीय क्षेत्रांमध्ये अशीच परिस्थिती असेल.
हेही वाचा – गणेशोत्सवानंतर सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर…
हेही वाचा – सुप्रिया सुळे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर, उद्दिष्ट काय? जाणून घ्या…
कर्नाटकच्या उत्तर किनारपट्टी भागासह दक्षिण कोकण आणि गोव्यानजीक पूर्वमध्य अरबी समुद्रावर एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हे क्षेत्र पुढील २४ तासांमध्ये धीम्या गतीने पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे म्यानमार आणि त्यालगतच असणाऱ्या बंगालच्या उपसागरावरही चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत आहे. परिणामी गोवा, महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी सांगण्यात आले असून काही भागांमध्ये थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.