वर्धा:  कोणत्या संस्थेतून शिक्षण पूर्ण केले, यास नोकरीवेळी विशेष महत्व दिल्या जाते. म्हणून संस्था व्यवस्थापन व गुणवंत विद्यार्थी हे गमक ठरते. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपल्या उत्तुंग प्रतिभेची व कल्पकतेची चुणूक दाखवीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. 

नुकत्याच सायनोडेंट व इंडियन सोसायटी ऑफ डेंटल रिसर्च (आयएसडी) यांनी मध्यप्रदेशातील लखनौ येथील किंग जॉर्जस् वैद्यकीय विद्यापीठात परिषद आयोजित केली होती.या बाराव्या जागतिक दंतविज्ञान व मौखिक आरोग्य परिषदेत  शरद पवार दंत महाविद्यालयातील शिवानी पथा या विद्यार्थिनीच्या पोस्टर सादरीकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. डॉ. शरयु निमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवानीने ‘द फ्युचर ऑफ मेक्सिलोफेशिअल डेंटिस्ट्री : एआय – पॉवर्ड इनोव्हेशन्स अँड ऍप्लिकेशन्स’ या विषयावरील पोस्टर सादर केले.  

हेही वाचा >>>सहार येथे आठ मीटर खोल खड्डा ; ‘मेट्रो’ भुयारीकरण कामात विध्न

तर, दुसरी आंतरवासीय विद्यार्थिनी नंदिनी ठकरानी हिला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘पियर फाऊचार्ड अकॅडमी इंटरनॅशनल सीनियर स्टुडंट अवॉर्ड’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला. दंतचिकित्सा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान आणि समर्पणाकरिता दरवर्षी भारतातील केवळ १५ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जात असून शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. 

दंतविज्ञान शिक्षण आणि संशोधनासाठी मेघे अभिमत विद्यापीठात नियमित दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी सतत ही कामगिरी बजावत आहेत, असे अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक यांनी आवर्जून सांगितले. विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, महासंचालक डॉ. राजीव बोरले, संचालक डॉ. तृप्ती वाघमारे, अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, उपअधिष्ठाता डॉ. अलका,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली बोरले यांनी या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

हेही वाचा >>>कृषी महाविद्यालयामध्ये आभासी प्रयोगशाळा उभारणार

पुरस्कारप्राप्त नंदिनी ठकरानी  या संदर्भात बोलतांना म्हणाली की अध्यापनच  नव्हे तर सर्वच क्षेत्रात मुलींचा पुढाकार असला पाहिजे असा येथील गुरुजणांचा प्रयत्न असतो. दंत वैद्यकीय शाखेतील भीष्माचार्य म्हणून सर्वत्र ओळख असलेले डॉ. राजीव बोरले सर हे हार्ड टास्क मास्टर आहेत. म्हणून आम्ही घडलो. कुलगुरू डॉ. वाघमारे सर  ही तर प्रेरणाच.