नागपूर: गणेशोत्सवानंतर मुंबईत ‘सीएनजी’चे दर तब्बल ३ रुपये प्रति किलोने घटल्याने मुंबईकर सुखावले आहे. परंतु नागपुरात हे दर कमी झाले नाही. त्यामुळे नागपुरकरांना वाहनांमध्ये सर्वात महागड्या दरात म्हणजे प्रति किलो ८९.९० रुपये दराने हे इंधन भरावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात ३ रुपये प्रति किलो अशी मोठी कपात केली आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरमध्ये आता वाहन धारकांना सीएनजी हे इंधन ७६ रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात या इंधनाचे दर कमी झाल्यावरही नागपुरात मात्र हे दर स्थिर आहे. त्यामुळे नागपुरकरांवर महागड्या म्हणजे प्रति किलो ८९.९० रुपये दरानेच सीएनजी घेण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा… महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले, नागपूरमध्ये कितीला मिळणार?

नागपुरातील एका सीएनजी पेट्रोलपंप चालकाच्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपर्यंत उपराजधानीत सीएनजीचा दर ९९ रुपये ९० पैसे प्रति किलो एवढा होता. तर गेल्यावर्षी या काळात नागपुरात सीएनजीचा दर १२० रुपये प्रति किलो होता. त्यामुळे गेल्यावर्षी देशात सर्वात महाग सीएनजी नागपुरात असल्याचे समोर आले होते. परंतु त्यानंतर काहीशी घसरण होऊन आधी ११६ रुपये प्रति किलो आणि नंतर १०६ रुपये प्रति किलो, तर १७ ऑगस्ट २०२३ पासून ८९.९० रुपये प्रति किलो अशी टप्प्याटप्प्याने सीएनजीच्या दरात घसरण झाली. परंतु आता पून्हा दर कमी झाल्यावरही नागपुरात कमी झाले नसल्याने ग्राहकांच्या खिशावर इंधनाचा वाढीव भार कायम आहे. दरम्यान नागपुरात मोठ्या संख्येने ऑटो सीएनजी वर चालतात. त्यामुळे ऑटो चालकांना दर कमी झाला नसल्याने फटका बसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The price of cng did not decrease in nagpur mnb 82 dvr