बुलढाणा: जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांमागील दुष्टचक्र कायमच आहे! खरीप हंगाम तोट्याचा ठरला असताना झेंडूलादेखील जेमतेम भाव मिळाला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली.
दसऱ्याच्या सणाला घर, बंगला ते लहान मोठी दुकाने, शोरूमला झेंडू फुलांची तोरणे लावतात. वाहनधारक आपल्या वाहनांना झेंडूचे हार लावतात. नवरात्रीत देवी देवतांच्या प्रतिमा, मूर्त्यांनाही याच मोहक फुलांचे हार चढवितात. त्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला झेंडूला मोठी मागणी राहते. ही बाब हेरून यंदा अनेक शेतकऱ्यांनी झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. सणासुदीला दोन पैसे जास्त हाती येईल, दसरा साजरा करता येईल या अपेक्षेत शेतकरी होते. मात्र इतर पिकांप्रमाणेच झेंडू नेदेखील बळीराजाची निराशा केली.
हेही वाचा – ओजसचे फडणवीसांकडून अभिनंदन, ऑलिंपिकसाठी सर्व सहकार्याचे आश्वासन
हेही वाचा – आतापर्यंत समजूतदारपणाच; मग आता नांगर फिरवता की काय? मनोज जरांगे-पाटील यांचा सवाल
उत्पादन व आवक जास्त झाल्याने झेंडूचे भाव २० ते ३० रुपये किलोपर्यंतच राहिले. आज सकाळी यात आणखी घसरण झाली असून ५० रुपयांत २ किलो या दराने फुलांची विक्री सुरू आहे. सोयाबिनच्या उत्पादनात घट झाली व अपुऱ्या पावसाने मालाचा दर्जा घसरला. तसेच भावदेखील चार हजारांच्या आसपास मिळत आहे. यातच झेंडूनेदेखील निराशाच केली.