अमरावती : पश्चिम विदर्भातील बाजारात भाजीपाल्‍याची आवक घटल्‍याने किमतीवर त्‍याचा परिणाम जाणवत असून बटाटा, कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोचे दर वाढले आहेत. कांदा, बटाटा किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो, तर टोमॅटो देखील ५० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत शुक्रवारी ५२८ क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान ९०० रुपये तर कमाल २ हजार ८०० रुपये म्‍हणजे सरासरी १ हजार ८०० रुपये दर मिळाला. अकोला बाजार समितीत गुरूवारी सरासरी २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजारात सध्‍या स्‍थानिक कांद्याचीच आवक आहे. अमरावती विभागात साधारणपणे १३ ते १५ हजार हेक्‍टरवर रब्‍बी / उन्‍हाळ काद्यांची लागवड केली जाते. यंदा अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात कांद्याची फारशी साठवणूक केली जात नाही. सध्‍या बाजारात कांद्याची आवक कमी आहे. गेल्‍या आठवडाभरात अमरावती बाजार समितीत केवळ ५०० ते ९००‍ क्विंटल दररोज आवक झाली. सात दिवसांत अमरावती बाजार समितीत कांद्याचे घाऊक सरासरी दर १३०० रुपयांहून १८५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. तर अकोल्‍यातील दर २२०० रुपयांहून २५०० रुपयांवर गेले आहेत.

हेही वाचा >>>विस्तव कायम! खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार सोहळ्यांपासून विजय वडेट्टीवार दूरच; काँग्रेसमध्ये…

बटाट्याच्‍या दरातही वाढ झाली आहे. उत्‍तर प्रदेश, मध्‍यप्रदेश, राजस्‍थान या राज्‍यांमध्‍ये बटाट्याचे उत्‍पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सर्वाधिक बटाट्याची शीतगृहे उत्‍तर प्रदेशात आहेत. उत्‍तरेकडील राज्‍यातील आवक ही येथील बाजारातील दर ठरवत असते. अमरावती बाजार समितीत शुक्रवारी केवळ ८४० क्विंटल बटाट्याची आवक झाली. किमान १४००, कमाल २४०० तर सरासरी १९०० रुपये दर मिळाला. आठवडाभरापुर्वी सरासरी दर १७०० रुपये होता. सात दिवसांत बटाट्याचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. नवीन बटाटा बाजारात येण्‍यास अजून चार ते पाच महिने लागणार आहेत. तोपर्यंत शीतगृहांमधील बटाट्यावर विसंबून रहावे लागणार आहे.

स्‍थानिक टोमॅटो संपल्‍याने आता मध्‍यप्रदेशातून टोमॅटोची आवक सुरू झाली आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले. आवक कमी झाल्‍याने घाऊक दर आठवडाभरात २२०० रुपयांवरून २३०० रुपयांवर पोहचले आहेत. नवीन टोमॅटो येण्‍यास आणखी ४५ दिवसांचा कालावधी लागू शकेल. त्‍यानंतर टोमॅटोचे दर स्थिर होऊ शकतील, असे व्‍यापाऱ्यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा >>>काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत, मात्र काँग्रेसमध्ये…

अवकाळीचा फटका, त्‍यात वाहतुकीचा खर्चही निघत नसल्‍याने बाजार समित्‍यांमध्‍ये भाजीपाला पाठवणे परवडत नसल्‍याचे काही शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे. किरकोळ बाजारात भाज्‍याचे दर दुप्‍पटीने वाढल्‍याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.शीतगृहे उघडल्‍यानंतर बाजारात बटाट्यांची आवक वाढेल, तेव्‍हा दर स्थिर होऊ शकतील, पण यंदा दर चढेच राहण्‍याची शक्‍यता आहे. कांद्याचे दरही आवक किती होते, यावर अवलंबून राहणार आहे. स्‍थानिक पातळीवर उपलब्‍ध होणारा टोमॅटो संपल्‍याने भाव वाढले आहेत. – दिनेश वाटाणे, भाजीपाला व्‍यापारी, अमरावती

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The prices of vegetables have increased due to the decrease in the arrival of vegetables in the market of west vidarbha mma 73 amy