वाशीम : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. परंतु ते केवळ मागासवर्गीय असल्यामुळे व समाजात त्यांची लोकप्रियता असून रिसोड तालुक्यातील सवड येथील आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळेच त्यांच्यावर सीबीआयने छापा टाकला. अशी जोरदार चर्चा असून समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ वाशीम येथे बुधवार, १७ मे रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांचे बंधू संजय वानखेडे यांनी दिली.
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे एनसीबी मुंबईचे झोनल अधिकारी असताना सिनेअभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यावर ड्रग्स प्रकरणी कारवाई केली होती. कायद्याचे उल्लघन करणाऱ्यावर कारवाई करणे हा गुन्हा नसून समीर वानखडे हे केवळ मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे समाजात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. रिसोड तालुक्यातील सवड येथे भीमगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
हेही वाचा >>> गडचिरोली : ‘चेजिंग रुम’ला छिद्र पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे शिक्षकाने केले चित्रीकरण
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक व इतर नेते उपस्थित असल्यानेच त्यांच्यावर जातीयवादी सरकारने जाणूनबुजून सीबीआयचा छापा टाकला असा आरोप समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांकडून होत असून समाज बांधवांच्या वतीने बुधवार १७ मे रोजी वाशीम येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला पँथर संघटनेचे दीपक केदार व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे संजय वानखडे म्हणाले.