लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : विभागीय मुख्‍यालय असलेल्‍या अमरावती शहरातील मध्‍यवर्ती बसस्‍थानकाची इमारत मोडकळीस आलेली असताना बसस्‍थानकाच्‍या विस्‍तारीकरणाचा प्रस्‍ताव अजूनही अडगळीत पडलेला आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीला ४९ वर्षे झाली असून, इमारतीचे आयुर्मान संपले आहे. विभागीय नियंत्रक कार्यालयाने याठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे १५ कोटी २१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मात्र, या निधीत बसस्थानकाचे नव्याने बांधकाम पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे विभाग नियंत्रक कार्यालयाने वरिष्ठस्तरावर २५ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.

आणखी वाचा-बापूंच्या सेवाग्रामला विकासाचे वावडे! असीम सरोदे म्हणतात न्यायालयात जा…

सध्या एक हेक्टर जागेवर बसस्थानकाचा कारभार सुरू आहे. यामध्ये बसस्थानकात किरकोळ कामासाठी कार्यशाळा तसेच आगार व्यवस्थापकांचे कार्यालय, डिझेल पंप, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह आदींचा समावेश आहे. त्यापैकी बसस्थानकासाठी ६० हजार वर्ग फूट जागा असून, त्यामध्ये केवळ दहाच फलाट आहेत. तेही अपुरे पडत आहेत. परिणामी प्रवाशांना गर्दीच्या वेळी गैरसोयीचा सामना करावा लागतो. याशिवाय बसस्थानकाच्या छतालाही वारंवार डागडुजी करावी लागत आहे.

राज्यातील इतर काही बसस्थानकांसोबत अमरावती बसस्थानकाच्या बांधकामासाठी १५.२१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, सध्या आहे तेवढ्याच जागेत नवीन बसस्थानक तयार करून विशेष फायदा होणार नाही. त्यामुळेच १५.२१ कोटी ऐवजी २५ कोटी रुपये निधी मिळाल्यास त्याच ठिकाणी संपूर्ण जागा बसस्थानकासाठी वापरात घेऊन विस्तीर्ण बसस्थानक साकारले जाऊ शकते. या अनुषंगाने सुधारित प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावानुसार बसस्थानकाच्या समोरील बाजूने दहा व मागील बाजूने तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या बससाठी स्वतंत्र पाच असे एकूण २५ फलाट प्रस्तावित केले आहेत. हा प्रस्ताव पाठविला असून, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.

आणखी वाचा-यवतमाळ : पैशांचा वाद; महिलेला चाकूने भोसकले

मध्यवर्ती बसस्थानक एक लाख वर्ग फूट जागेत साकारले जाणार आहे. त्यामुळे सध्या येथे असलेले आगार व्यवस्थापक कार्यालय तसेच तात्पुरती कार्यशाळा मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी तपोवन कार्यशाळा परिसरात स्थलांतरित करावी लागेल. या कामासाठी लागणारा खर्च लक्षात घेता २५ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्‍यात आला आहे.

आमदार सुलभा खोडके यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्‍या दरम्‍यान हा मुद्दा उपस्थित करून विस्‍तारीकरणाचा प्रस्‍ताव केव्‍हा मंजूर करणार, असा सवाल केला. अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता तसेच बसस्थानकावर वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता विस्तारीकरण व प्रशस्त बसस्थानक होऊ शकते, तसेच चालक, वाहक व कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा चांगल्या सुविधा निर्माण करता येऊ शकतात, याकडे सुलभा खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

अमरावतीत सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधांची पूर्तता तसेच आरोग्य , शिक्षण, क्रीडा व रस्ते विकास आदींबाबत चांगल्या दर्जेदार व गुणवत्तापूर्वक सुविधा निर्माण होत असताना प्रवासी वाहतूक सेवा सुद्धा सुरक्षित व बळकट होणे आवश्‍यक आहे. अमरावती मध्‍यवर्ती बसस्‍थानकाच्‍या विस्‍तारीकरणाच्‍या प्रस्‍तावाला तत्‍काळ मंजुरी मिळावी. -सुलभा खोडके, आमदार, अमरावती.