लोकसत्ता टीम
अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ‘एलएलबी’च्या परीक्षेआधी प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर प्रसारीत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या परीक्षा केंद्रावर समोर आला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी भाजपाचे माजी नगरसेवक प्रणीत सोनी यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सध्या सुरू आहेत. शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या परीक्षा केंद्रावर शनिवारी सकाळी ९ ते १२ या कालावधीत विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या ‘लॉ ट्रस्ट’ या विषयाची परीक्षा होती. मात्र परीक्षा सुरू होण्याआधीच समाज माध्यमाद्वारे अनेकांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका पोहचली. तसेच या विषयाच्या छायांकित प्रती देखील तिघांजवळ आढळून आल्याचे कळते.
हेही वाचा… नागपूर : सरकारी बैठकांसोबत भाजपाचे मेळावेही, फडणवीसांच्या मनात काय?
परीक्षा सुरू असताना एलएलबीच्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर प्रसारीत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर लगेच या प्रकाराची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक परीक्षा केंद्रस्थळी पोहचले. त्यांनी चौकशी सुरू केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली.
हेही वाचा… नागपूर : कॉंग्रेसमधून निलंबित आशीष देशमुख यांच्या निवासस्थानी फडणवीस
या प्रकरणात भाजपाचे माजी नगरसेवक प्रणित सोनी, भूषण हरकुट, किशोर पिंपळकर या तिघांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.