नागपूर: महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तीकडून रेल्वे सुरक्षा दलाने तब्बल ४१.२३ किलो चांदी इतरवारी रेल्वे स्थानकावर जप्त केली. या चांदीचे बाजार मूल्य सुमारे ९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी एक पथक तयार करण्यात आले. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या संशयित व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आरपीएफचे पथक बुधवारी विविध गाड्यांची तपासणी करीत असताना त्यांना चांदी तस्करीची माहिती मिळाली. त्यांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या पथकावर लक्ष ठेवले.
हेही वाचा… मिलिटरी कॅन्टीन पुलगावला नाही तर अमरावतीलाच
गाडी फलाटावर (क्रमांक ४) येताच पथकाने दोन प्रवाशांकडून ४१.२३ किलो चांदी जप्त केली. त्याची किंमत सुमारे ९ लाख रुपये आहे. ही कारवाई निरीक्षक एस.ए. राव, निरीक्षक नंद बहादुर, उपनिरीक्षक विवेक मेश्राम, सहायक उपनिरीक्षक के.के .निकोड़े, प्रधान आरक्षक उपेंद्र काथोते, आरक्षक बंसी हलमारे व आरक्षक प्रीतम यांच्या पथकाने केली.