लोकसत्ता टीम
बुलढाणा: चुरशीने पार पडलेल्या व वादळी ठरलेल्या बुलढाणा बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भावी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरलेली ही लढत मैदानात गाजण्यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालय ते उच्च न्यायालयपर्यंत पोहोचल्याने वादळी ठरली. आज संध्याकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या निकालांत या नेत्यांसह शिंदे गट- भाजपा युती आणि महाविकास आघाडीच्या वर्चस्वाचादेखील फैसला होणार आहे.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यातही आरोप प्रत्यारोपाने वादळ निर्माण झालेल्या या निवडणुकीसाठी आज होत असलेल्या मतदानात मात्र वादळाचे पडसाद उमटले नाही. आज शुक्रवारी सकाळी ८ केंद्रावरून सुरू झालेल्या मतदानाची गती संथ होती. सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान जेमतेम ११ टक्केच मतदानाची नोंद झाली आहे. १५९४ पैकी १७६ मतदारांनीच पहिल्या टप्पात मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी आर. एल. हिवाळे व सहकार अधिकारी अनिल खंडारे यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा… ‘बबली’ बदमाश! आता बछडेही त्याच वाटेवर; ताडोबातील पाणवठ्यावर मस्ती
आठ केंद्रावरील मंद गतीने सुरू झालेले मतदान सर्वपक्षीय नेत्यांनाच नव्हे तर एक महिन्यापासून अहोरात्र झटणाऱ्या सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चक्रावून टाकणारी ठरली आहे.
दरम्यान, १५९४ मतदार १८ संचालक निवडणार आहे. ग्रामसेवा सोसायटी मतदारसंघात ३१०, ग्रामपंचायतमध्ये ६१५, अडते व्यापारीमध्ये ३३४ तर हमाल मापारी मतदारसंघात २५५ मतदार आहेत. आठ केंद्रांवरील मतदानाची जबाबदारी सतीश गवई, एस. एस. जुंबड, व्ही. पी. भुसारी, वैशाली गवई, यु. के. सुरडकर, एस. एस. पाटील, एस. एस. तायडे, जी. जे. आमले, डी. बी. बॉंडे, जी. एस. गायकवाड, बाळू सोनुने, बी. जे. नेवरे, जे. व्ही. रायबुले, सुभाष सोनुने, सुनील कानडजे, प्रेमकुमार टूनलाईट, एस. ए. वाघ, एस. बी. चिंचोळकर यांनी सांभाळली आहे.
कडक पोलीस बंदोबस्त आणि मतदानाचे होणारे व्हिडीओ चित्रण यंदाच्या मतदानाचे वैशिष्ट्य ठरले. काही महिन्यांपूर्वी शिंदे गटाने राडा करीत बाजार समितीत आयोजित ठाकरे गटाचा उधळलेला कार्यक्रम लक्षात घेता एक पीएसआय आणि दहा पोलीस असा बंदोबस्त आज बाजार समिती परिसरात तैनात करण्यात आला.