वर्धा : बारावीच्या परीक्षेची जबाबदारी शिक्षक व शिक्षण खात्यावर असली तरी त्यांच्यावर लक्ष महसूल खाते ठेवणार असल्याने शिक्षक संताप व्यक्त करीत आहे. परीक्षेत गैरवापर दिसून आल्यास पर्यवेक्षक शिक्षकांवर कारवाई करण्याची तंबी मिळाली आहे. शिक्षक नेते अजय भोयर यांनी आज शिक्षणमंत्र्यांनी फॅक्सद्वारे निवेदन पाठवून शिक्षकांवर अविश्वास असेल तर परीक्षा यंत्रणा महसूल विभागाकडे सोपविण्याचा टोला लगावला आहे.
शिक्षकांची परीक्षेची जबाबदारी काढून घेतल्यास उत्तम, अशी टिपणी त्यांनी निवेदनातून केली आहे. जनगणना व अन्य कामात शिक्षक चांगले काम करतात म्हणून बतावणी करायची आणि त्यांची जबाबदारी असणाऱ्या परीक्षेच्या कामात महसुलचे पथक नेमायचे. हे दुटप्पी धोरण कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी शासनाने तहसीलदार व तत्सम अधिकारी वर्ग लक्ष ठेवण्यासाठी नेमला आहे.