महिलांना मुक्तपणे विविध क्षेत्रात जाता आले पाहिजे, यासाठी त्यांच्याकडील जबाबदारीचे विभाजन होणे आवश्यक आहे. महिला म्हणून ती करत असलेल्या काही कामांची जबाबदारी पुरुषांनी स्वीकारावी, असे प्रतिपादन कोलकाता येथील भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या संचालक डॉ. द्रिती बॅनर्जी यांनी केले.
हेही वाचा- चिंता नको, क्षयरोग नियंत्रणासाठी ‘बीसीजी’ लसींवर काम सुरू..! डॉ. शेखर मांडे यांची माहिती
भारतीय विज्ञान काँग्रेसनिमित्त आयोजित महिला विज्ञान काँग्रेसच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ डॉ. अदा योनाथ, डॉ. हॅगीथ योनाथ, राष्ट्रीय फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालक डॉ. शशी बाला सिंग, भारतीय विज्ञान काँग्रेस संस्थेच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, सचिव डॉ. एस. रामकृष्णन, संयोजक डॉ. कल्पना पांडे आदी यावेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा- ‘अजित पवारांच्या पदावर भुजबळांचा डोळा’; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या १०५ वर्षांच्या इतिहासातील डॉ. द्रिती बॅनर्जी या पहिल्या महिला संचालक आहेत. त्या म्हणाल्या, वैदिक काळात महिला सर्वच क्षेत्रात पुढे होत्या. समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्या सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडत होत्या. नंतरच्या काळात मात्र त्या कौटुंबिक जबाबदारीत बांधल्या गेल्या आणि समस्या निर्माण झाल्या. आता महिलांनी स्वबळावर पुन्हा विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. कोणतेही क्षेत्र शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा झाली पाहिजे, असे डॉ. बॅनर्जी म्हणाल्या. डॉ. शशी बाला सिंग म्हणाल्या, महिलांनी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. प्रास्ताविक डॉ. कल्पना पांडे यांनी केले. संचालन व आभार डॉ. मंजू दुबे यांनी केले.