नागपूर : यंदा उशिरा आगमन झालेल्या आणि मोठा ‘ब्रेक’ घेतलेल्या पावसाच्या परतीचा प्रवासही उशिराच सुरू होणार आहे. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदाही लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तराखंड राज्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून, वायव्य भारतातून पावसाच्या परतीसाठी अद्यापही पोषक स्थिती नाही. तिथे पावसाने उघडीप दिल्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी २० सप्टेंबरला मॉन्सूनचे वारे राजस्थानातून माघारी फिरले होते. मॉन्सूनचे पावसाचे आगमन आणि परतीच्या वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही त्याच्या राजस्थानातून परतीचा प्रवासाची तारीख आहे. मात्र, सध्या राजस्थानसह वायव्य भारतातील राज्यात हलक्या स्वरुपात पाऊस सुरू आहे.
हेही वाचा – अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७७.१८ टक्के जलसाठा
या भागात पाऊस सुरू राहण्यासाठी पोषक प्रणाली तयार होत असल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २० सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू होण्यास १४ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागली. त्यानंतर २३ ऑक्टोबरला मॉनसून संपूर्ण देशातून परतला होता. यावर्षी मॉन्सूनचे केरळमधील आगमन ८ जूनपर्यंत लांबले.
हेही वाचा – वर्धा: युवतीवर अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल, पण त्याच दिवशी…
तळ कोकणात ११ जूनला दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली. २३ जूनला राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या सहा दिवस आधीच मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात पोहोचला होता. वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलणे आवश्यक असते. त्यानंतरच या भागातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते. त्यामुळे यंदा मॉन्सून दसरा साजरा करूनच परतीचा प्रवास सुरू करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.