नागपूर : नागपूरसह राज्यातील बऱ्याच भागात पाऊस पडत असला तरी वातावरण बदलामुळे व्हायरल व बॅक्टेरियल प्रादुर्भाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अन्य ऋतुंच्या तुलनेत पावसाळ्यात व्हायरल इंफेक्शनचा धोका दुप्पट असल्याचे मत डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले.
बदलत्या वातवरण विशेषतः पावसाळी वातावरणात अचानक तापमानात घट झाल्याने आणि वातावरणात आद्रता वाढल्याने शरीरावर बॅक्टेरिया व व्हायरसचा प्रादुर्भाव होऊन सर्दी व ताप, घश्यात खवखव, थंडी वाजून ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात. शिवाय डासांची संख्या वाढून मलेरिया, डेंग्यु व चिकनगुनिया विकारांची साथ येऊ शकते. कॉलरा, टायफाईड, हेपटायटिस या जलजन्य विकारांचाही धोका वाढतो.
हेही वाचा >>>एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची काळी यादी जाहीर, यापुढे परीक्षा…
अस्थमा, सीओपीडी, दीर्घकालीन कफ, फुफ्फुसाचे कर्करोग विकारांच्या रुग्णांना लवकर विषाणू व जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊन गुंतागूंत होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. पार्किंसन सारख्या वयोमानानुसार होणार्या मेंदूविकार रुग्णांना देखील वातावरण बदलाचा त्रास संभवतो.
हेही वाचा >>>नातेवाईकावरील अंत्यसंस्कारानंतर अस्थी गोळा करण्यासाठी चाललेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत मृत्यू
ज्या रुग्णांना श्वसनविकाराची जोखिम आहे व त्यांना अन्य विकार (सहआजार) जसे मधूमेह- उच्चरक्तदाब आदी विकार आहे; त्यांनी मुखपट्टी, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन केले पाहिजे. अशा रुग्णांनी स्वतःचे लसीकरण करवून घ्यावे. दरवर्षी येणारी ‘फ्लु’ची लस घेणे फायद्याचे आहे. ज्येष्ठांनी कॉमन निमोकोकल व्हॅक्सिन घेण्यास प्राधान्य दिल्यास उत्तम असल्याचेही ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ व क्रिम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले.