नागपूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानासमोरील सिमेंट रस्ता पूर्णपणे जमिनीत गेल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला शहरातील जयंत टॉकिज ते झाडे हॉस्पिटल हा मुख्य मार्ग एका महिन्यातच उखडला आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. महापालिकेच्या दर्जाहीन आणि निकृष्ट कामांची एकेक करून पाेलखोल होत आहे.

हेही वाचा- ‘रखडलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करा’; आक्रमक मेडीगड्डा धरणग्रस्त सहकुटुंब बेमुदत उपोषण करणार

जयंत टॉकिज ते झाडे हॉस्पिटलपर्यंत महापालिकेच्या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याच्या बांधकामाची अंदाजित रक्कम ही ५० लाख रुपये आहे. कंत्राटदाराने अवघ्या पंधरा ते वीस दिवसात हा रस्ता बांधला. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने हा रस्ता महिनाभरातच उखडला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने रस्त्यांची गुणवत्ता तपासल्यानंतरच कंत्राटदाराला देयके देणे बंधनकारक होते. मात्र, महापालिकेतील अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने कंत्राटदारला देयकेसुद्धा देण्यात आली आहे. दरम्यान, अवघ्या एका महिन्यातच रस्ता उखडत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोरील नवीन बांधकाम झालेला रस्ता अवजड वाहन गेल्याने दबल्या गेला होता. कंत्राटदाराला निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे लक्षात येताच तसेच अनामत रक्कम खोळंबू नये म्हणून त्याने तातडीने रस्ता फोडून नव्याने रस्ता बांधला होता.

हेही वाचा- बुलढाणा : खामगावात अग्नितांडव, आठ दुकानांची राख

यासंदर्भात प्रभागाचे अभियंता रवी हजारे यांना विचारणा केली असता, संबंधित कंत्राटदाराला रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक जयस्वाल यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला. रस्ता वाहतुकीसाठी सुरू केल्यानंतर लगेच उखडण्यास सुरुवात झाली. जागृत नागरिकांनी समाज माध्यमांद्वारे रस्त्याचे निकृष्ट काम निदर्शनास आणून दिले होते.

Story img Loader