वाशिम : येथील पंचायत समितीच्या सभापती कक्षातील छताचा काही भाग पावसामुळे खचून पडल्याची घटना आज २० जुलै रोजी सकाळी घडली. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने कुणीही कक्षात उपस्थित नसल्याने दुर्घटना टळली.

वाशिम पंचायत समितीच्या इमारतीचे उद्घाटन १५ सप्टेंबर १९६० मध्ये झाले होते. या इमारतीला ६३ वर्षे पूर्ण झाली असून इमारतीला अनेक ठिकाणी तडे पडली आहेत. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी झिरपते. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. पावसाच्या पाण्यामुळे आज सकाळी पंचायत समितीचे सभापती कक्षातील छताचा काही भाग कोसळला. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने कक्षात कुणीही हजर नव्हते, त्यामुळे दुर्घटना टळली. परंतु सदर इमारत अत्यंत जीर्ण झाली असल्याने कर्मचारी भीतीच्या सावटाखाली काम करीत असून अनेक नागरिक विविध कामांसाठी येत असतात. तसेच भविष्यात दमदार पाऊस झाल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – नागपूर : ‘लंडन स्ट्रीट’वर आता भाजी विकली जाणार, नितीन गडकरींचा प्रकल्प येणार पूर्णत्वास

हेही वाचा – देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर इमर्जन्सी अलर्ट; स्थानिक गुन्हे शाखेचे घाबरु नका असे आवाहन

इमारत स्थलांतरित करण्याची मागणी

वाशिम पंचायत समितीची इमारत जीर्ण झाल्याने तात्काळ इतर ठिकाणी स्थलांतरित करावी, यासाठी गट विकास अधिकारी तोटावार, पंचायत समिती सभापती वानखेडे, पंचायत समिती सदस्य दीपक खडसे, सरपंच विनोद पट्टेबहादूर हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीला गेले आहेत.