महाराष्ट्रात महापुरुषांच्या प्रतिमा हनन करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू आहे. अशावेळी सरकार चूप असते. तुमच्या मनपलटावरील महापुरुष पुसून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्याऐवजी महापुरुष म्हणून हेडगेवार आणि गोळवलकर अशी नावे स्थापित करायची आहे, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.
शहरातील सामाजिक संघटनांच्यावतीने काल गुरुवारला महापुरुषांच्या स्वप्नातील भारत याविषयावर व्याख्यान इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए.पी. पिल्लई उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून सुषमा अंधारे, दिलीप सोळंकी तर विशेष अतिथी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे उपस्थित होते.
यावेळी आमदार वडेट्टीवार, दिलीप सोळंकी यांनी याविषयावर भाष्य केले. तत्पूर्वी साहित्य क्षेत्रासाठी पद्मरेखा धनकर, कला क्षेत्र शैलेश दुपारे, पत्रकारिता प्रमोद काकडे आणि सामाजिक कार्यासाठी डॉ. राकेश गावतुरे आणि डॉ. अभिलाषा बेहरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, नगरसेवक पप्पू देशमुख, राजू झोडे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक लिमेश जंगम तर संचालक शाकीर मलिक यांनी केले. नागरिकांची कार्यक्रमाला भरगच्च उपस्थिती होते.
हेही वाचा- कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताचे प्रयत्न; माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांचे प्रतिपादन
‘माझा घातपात केला जाईल’
माझ्या विरोधात ईडी लावू शकत नाही. बदनामीचा प्रयत्न केला. तोही फसला. माझ्या प्रश्नांची उत्तर सरकारकडे नाही. तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे तुमचा अपघात घडवला जाऊ शकतो, असे अनेकजण सांगतात, असा गौप्यस्फोटही सुषमा अंधारे यांनी केला.