महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहर अमरावती आणि अकोला येथील विमानतळावर मोठे प्रवासी विमान उतरण्यासाठी आणि मालवाहतूक होण्याकरिता धावपट्टी २४०० मीटर लांब करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत या दोन्ही विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी धावपट्टीची लांबी वाढवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच या दोन्ही विमानतळावर दिवसरात्र विमान उतरू शकतील, अशी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राज्य सरकारने आवश्यक भूसंपादन तातडीने करून द्यावे –
सध्या अमरावती विमानतळावर १८०० मीटर लांब धावपट्टीचे काम सुरू आहे. या धावपट्टीवर ८० ते ९० आसनी विमान उतरू शकतात. ही धावपट्टी २४०० मीटर लांब करण्यात आल्यास तेथे १६० ते १८० आसनी विमान उतरू शकणार आहे. तसेच अकोला विमानतळाची धावपट्टी १३०० मीटरहून १८०० मीटर करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने आवश्यक भूसंपादन तातडीने करून द्यावे. त्यासाठी ८० ते ९० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या बैठकीला केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह उपस्थित होते.
तसेच, या दोन्ही विमानतळांची भविष्यातील गरज लक्षात घेता प्रवासी व मालवाहतूक विमानांसाठी लागणारी मोठी धावपट्टी, सर्व प्रकारच्या वातावरणात विमानांचे टेकऑफ/लँडिंग करता यावे, अशी सूचना गडकरींनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले जात आहे.