बनावट वैवाहिक संकेतस्थळाच्या माध्यमातून उपवर वधूचे बनावट परिचयपत्र तयार करायचे. त्यानंतर बदनामीची धमकी देऊन लाखो रुपये उकळणाऱ्या वर्धेपाठोपाठ नागपूरच्या कंपूस वर्धा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी वर्धेच्याच एका युवतीने तक्रार केली होती.
‘रिश्ते गाईड डॉट कॉम’ या संकेतस्थळावर हा गोरखधंदा चालत होता. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील अग्रवाल यांच्या घरी भाड्याने सुरू असलेल्या केंद्रात धाड टाकण्यात आली. तुषार दिलीप कोल्हे (रा, स्नेहनगर, छत्रपती चौक, नागपूर) यास अटक करण्यात आली. त्यानंतर हे जाळे उजेडात आले. आरोपी तुषार याने सेलू तालुक्यातील रुचिका दादाराव खोब्रागडे हिची मदत घेत विवाह संस्थेच्या संकेतस्थळाची शाखा घेत समाज माध्यमातून मुलामुलींचे फोटो व व्यक्तिगत माहिती चोरली व त्यांची बनावट परिचय पत्रे तयार केली. त्यावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या पालकांना खोटी माहिती दिली जात असे. माहिती देण्यापूर्वी ग्राहकांकडून स्थळाच्या दर्जानुसार पाच, दहा, हजारांचे पॅकेज हे आरोपी उकळत. तसेच नोंदणी व अन्य शुल्क वसूल केले जात असे.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वर्धेतील कारला चौकात धाड टाकली. येथे एका तरुणीद्वारे काम चालत होते. येथून नागपूरचा गोरखधंदा उजेडात आला. आरोपीने नागपुरात रामेश्वरी, नवरंग पॅलेस, काशीनगर येथेही अशा अन्य संकेतस्थळावर मुलामुलींची खोटी माहिती भरून फसवणूक केल्याचे मान्य केले. या दोन्ही प्रकरणात २५ मोबाईल, संगणक, लॅपटॉप व रोख रक्कम जप्त करण्यात आले.