अमरावती : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यंदा ऑगस्टमध्ये पावसाचा खंड, काही भागात झालेली अतिवृष्टी यामुळे पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असून त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ऋषिकेश नंदकुमार पारधी (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ऋषिकेश हा इलेक्ट्रिकल दुरुस्तीचे दुकान चालवीत होता; तसेच वडिलांच्या नावे असलेली ३८ आर शेती वाहत होता. त्यावर वडिलांच्या नावे चुकविता न आलेले कर्ज होते. या कर्जफेडीच्या विवंचनेला कंटाळून त्याने जीवनयात्रा संपवली. अविवाहित असलेला ऋषिकेश हा कुटुंबातील एकुलता कमावता होता. त्याच्या पश्चात ६२ वर्षीय आई, धाकटा भाऊ व दोन बहिणी आहेत.
हेही वाचा >>> घरकुल अनुदानात शहरी, ग्रामीण भेदभाव? अपुऱ्या अनुदानामुळे घरकुले रखडली
मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथील प्रवीण रामकृष्ण हरणे (३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील आहेत. मोर्शी तालुक्यातीलच सावरखेड पिंगळाई येथील गोपाल मुकुंदराव तायडे (५०) या शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे मौजा सावरखेड पिंगळाई शिवारात दहा एकर शेती आहे. त्यांनी कपाशी व सोयाबीनचे पीक पेरले होते. शेतात पेरणीसाठी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि खासगी वित्तपुरवठा कंपनीचे कर्ज घेतले होते.