चंद्रपूर : भद्रावती नगरपरिषद क्षेत्रातील केसूर्ली भागातील बालाजी वाटर पार्कमध्ये वाघ दिसल्याने परिसरातील नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. याच वाघाने २ दिवसापूर्वी या परिसरात गाईला ठार मारले होते.
भद्रावती शहरालगत असलेल्या बालाजी वाटर पार्क मध्ये १५ नोव्हेंबरच्या पहाटे १२.४५ वाजता वाघाने प्रवेश केला. तो पहाटे ५ वाजेपर्यंत तिथेच होता. चौकीदार पांडुरंग पारशिवे आणि रमेश कंडे यांनी ही माहिती तेव्हाच पार्कचे मालक भारत नागपूरे यांना भ्रमणध्वनी वरून दिली. भारत नागपूरे हे आपले सहकारी प्रशांत डाखरे, अनंता मांढरे यांना घेऊन खातरजमा करण्यासाठी सकाळी गेले. तेव्हा वाघाचे पगमार्क सर्वत्र दिसले.भाजपाचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांच्या नेतृत्वात वन विभाग कार्यालयात वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे यांची भेट घेऊन माहिती दिली.यावेळी १५० ते २०० जणांचा जमाव होता. शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून या वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल असे उपस्थितांना सांगितले.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री शिंदे यांनी नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे साजरी केली दिवाळी
वाघाची ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे. पार्क हा शहराला लागूनच असल्याने या ठिकाणी वाघाच्या वास्तव्याने नागरिकत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात असलेल्या शेतात पीक कापणीसाठी मजूर सुद्धा यावयास तयार नाही. पहाटे आणि सायंकाळी या भागात फिरणारे नागरिक सुद्धा दहशतीत आहे. त्यांनी आपले फिरणे बंद केले.