प्रशांत देशमुख
वर्धा : शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यभरातील संपकरी विविध संघटनांच्या समन्वय समितीला आज शासनाकडून चर्चेचे निमंत्रण आले. पण, दुपारी अकराची वेळ देऊनही बैठक सुरू न झाल्याने अस्वस्थता वाढत आहे. राज्य शासनाच्या अवर सचिवांनी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांना चर्चेस येण्याचे निमंत्रण आजच देत सकाळी अकराची वेळ दिली. मात्र, अद्याप बोलावले नसल्याचे जिल्हा निमंत्रक हरिश्चंद्र लोखंडे यांनी सांगितले.
सायंकाळपर्यंत सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राजपत्रित अधिकारी संघटनेने २७ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या त्यांचा संपास केवळ पाठिंबा आहे. त्यांनी काम बंद केले तर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा ठप्प पडू शकते. या पार्श्भूमीवर आज सकाळीच चर्चा करण्याचे निमंत्रण आले. पण बैठक सुरू झाली नसल्याची माहिती लोखंडे यांनी दिली.