अमरावती : मोर्शी येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्‍या मायलेकाच्‍या हत्‍या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुलाला हैद्राबाद येथून ताब्‍यात घेतले असून जन्‍मदा‍त्रीच्‍या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी मुलानेच थंड डोक्‍याने आईची आणि लहान भावाची हत्‍या केल्‍याचे निदर्शनास आले आहे. सौरभ गणेश कापसे (२४, रा. शिवाजी नगर, मोर्शी) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्‍या १ सप्‍टेंबर रोजी मोर्शी येथे नीलिमा गणेश कापसे (४८) आणि आयुष गणेश कापसे (२०) या दोघांचे मृतदेह त्‍यांच्‍या राहत्‍या घरी कुजलेल्‍या स्थितीत लाकडी दिवाणाच्‍या कप्‍प्‍यात आढळून आले होते. घटनेच्‍या दिवसापासून नीलिमा यांचा मोठा मुलगा बेपत्‍ता होता. नीलिमा यांचे आई-वडील कोंढाळी येथे राहतात. ते सातत्‍याने नीलिमा आणि दोघाही नातूंच्‍या संपर्कात होते.

हेही वाचा – Teachers Day 2023 : वंचितांना रस्त्यावरच अक्षरांची ओळख पटवून देणारा ‘फूटपाथी’ शिक्षक

पाच-सहा दिवसांपासून त्‍यांचे मोबाईल बंद दाखवित असल्‍याने नीलिमा यांचे वडील जेव्‍हा मोर्शीत पोहोचले, तेव्‍हा हत्‍येची घटना उघडकीस आली होती.
नीलिमा यांच्‍या पतीचे यापूर्वीच निधन झाले होते. त्‍या कंत्राटी तत्‍वावर पंचायत समितीत काम करीत होत्‍या. सौरभ हा विद्युत अभियांत्रिकी पदविका पूर्ण करून अमरावतीत सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी तत्‍वावर काम करीत होता. तर आयुष हा अमरावतीत महाविद्यालयात शिकत होता. दोघेही भाऊ बराच काळ घराबाहेरच राहत असत. त्‍यावेळी त्‍यांच्‍या घरी ओळखीतील काही लोकांची ये-जा होती. यातूनच आरोपी सौरभ याने आईच्‍या चारित्र्यावर संशय घेण्‍यास सुरुवात केली. पण, त्‍याने कुठेही वाच्‍यता न करता, राग मनातच ठेवला. त्‍याने आईची हत्‍या करण्‍याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – अमरावतीतील हवा शुद्ध, देशात प्रथम क्रमांक

सौरभ याने थंड डोक्‍याने हत्‍या करण्‍याच्‍या विविध पद्धतीचा इंटरनेटवर अभ्‍यास केला. काही वनौषधींच्‍या अतिसेवनामुळे विषामध्‍ये रुपांतर होते, अशी माहिती त्‍याने गोळा केली. ते भोजनातून आईला आणि भावाला देण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न होता, पण तो यशस्‍वी होऊ शकला नाही. दरम्‍यान, त्‍याने धोतरा या वनस्‍पतीच्‍या फळातील विषारी बियांची पावडर भाजीत मिसळली. नीलिमा आणि आयुष या दोघांनी त्‍याचे सेवन केल्‍यानंतर त्‍यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले. त्‍याने दोघांनाही स्‍थानिक दवाखान्‍यात नेले. नंतर घरीच उपचार करू असे सांगितले. एका मित्राला बोलावून सलाईन लावली. सलाईनमध्‍ये भूल देण्‍यासाठी वापरण्‍यात येणारी औषधी मिसळली. औषधींच्‍या अतिसेवनाने दोघांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर त्‍याने मृतदेह दिवाणाच्‍या कप्‍प्‍यात टाकून तो पसार झाला. मोर्शी पोलिसांनी आरोपी सौरभला अटक केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The son murder mother amravati district case mma 73 ssb
Show comments