अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर: दहा वर्षीय मुलाने गेम खेळायला वडिलांचा मोबाईल घेतला. मोबाईलवर एका महिलेचे संदेश वाचले. मुलाने वडिलांच्या मोबाईलमध्ये ‘लाईव्ह लोकेशन’ सुरु केले. त्यानंतर आई, मामाला घेऊन थेट ओयो हॉटेलमध्ये पोहचला व वडिलांना प्रेयसीसोबत रंगेहात पकडून दिले. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले. पोलिसांनी तिघांचेही समूपदेशन करून नात्यातील गुंता सोडवला.
आशिष आणि प्राजक्ता (काल्पनिक नाव) हे दोघेही उच्चशिक्षित. आशिष पूर्वी वर्ध्यातील एका नामांकित शाळेत मुलांसाठी समूपदेशक म्हणून काम करीत होता. सध्या नागपुरातील मोठ्या रुग्णालयात समूपदेशक आहे. प्राजक्ता ही पी.एचडी. झाली असून एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. दोघेही बारावीत असताना त्यांचे प्रेमसंबंध जुळले. पदवीचे शिक्षण घेताना दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
हेही वाचा… ‘वाघांची कहाणी’ उलगडण्याची संधी!; ‘कॉफी टेबल बुक’चे उद्या मुंबईत प्रकाशन
मात्र, प्राजक्ताच्या कुटुंबीयांचा विरोध होता. आशिषने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. दोन मुले झाली. सुखी संसार सुरु होता. दरम्यान, आशिष एका शाळेत समूपदेशक होता. शाळेतील एका ९ वर्षांच्या मुलाचे वडील करोनाने मृत पावले. तो मुलगा नैराश्यात गेला. त्या मुलाला आई (संजना) हिने आशिषकडे समूपदेशनासाठी आणले. महिन्याभरात मुलगा पुन्हा अभ्यासाला लागला. त्यामुळे संजनाने आभार मानले आणि मोबाईल क्रमांक घेतला. दोघांमध्ये काही दिवस संवाद सुरु होता. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. विधवा असलेल्या संजनाच्या जीवनात नव्याने प्रेमांकुर फुलला. विवाहित असलेल्या आशिषने तिला प्रेयसी म्हणून साथ देण्याचे वचन दिले. त्यामुळे संजनानेही प्रेमाच्या सीमा ओलांडल्या.
कुणीतरी बाबांना ‘आय लव्ह यू’ म्हणतेय….
वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळताना संजनाचे संदेश येत असल्याने मुलाने ते वाचले. तिने ‘आय लव्ह यू’ असे लिहून कारंजा येथील ओयो हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले. मुलाने आईला तो संदेश सांगितला. आईचा विश्वासच बसत नव्हता. शेवटी मुलाने वडिलाच्या मोबाईलमध्ये ‘लाईव्ह लोकेशन’ सुरु केले. प्रेमविवाह केलेल्या पतीकडून अशा अनपेक्षित वागणुकीचा पत्नीला धक्का बसला.
सासरी प्रियकराला भेटता येत नसल्याने कोंडी
संजनाला सासरी प्रियकराला भेटता येत नसल्याने ती माहेरी आली. तेथे दोघेही भेटत होते. तिने आईला प्रियकराबाबत माहिती दिली आणि सासरीही सांगण्याची तयारी केली होती. ठरल्यानुसार संजना आणि आशिष ओयो हॉटेलमध्ये भेटायला गेले. काही वेळातच आशिषच्या मुलाने लाईव्ह लोकेशनच्या आधारे पत्ता काढला. आई आणि मामासह मुलगा हॉटेलमध्ये पोहचला. खोलीत पती आणि प्रेयसीला नको त्या अवस्थेत पत्नीने पकडले.
समूपदेशनाने सुटला गुंता
या प्रकरणी पोलीस तक्रार झाली. आशिष आणि प्राजक्ताचे प्रकरण भरोसा सेलमध्ये गेले. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे, शुभांगी तकित आणि प्रेमलता पाटील यांनी तिघांचेही समूपदेशन केले. दोघांनीही चूक झाल्याची कबुली दिली. संजनाने नात्यातीलच विधूर व्यक्तीसह पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला तर आशिषने पत्नी प्राजक्ताची माफी मागितली. अशा प्रकारे भरोसा सेलमुळे विस्कळीत संसार पुन्हा रुळावर आला.