वर्धा: राज्य ग्रंथालय संघातर्फे पवनार ते वर्धा वारी काढून विविध समस्यांवर लक्ष वेधण्यात आले. पवनार येथील विनोबा आश्रम ते वर्धेतील गांधी पूतळा दरम्यान निघालेल्या या पदयात्रेत कोकणवगळता राज्यभरातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी सहभागी झाले हाेते. आश्रमस्थळी झालेल्या आरंभसभेत ज्येष्ठ समाजसेवी पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री, प्रा.डॉ.नारायण निकम, बजाज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रदिप बजाज, डॉ.राजेंद्र मुंढे यांनी मार्गदर्शन केले. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार यांच्या नेतृत्वात पदयात्रेस प्रारंभ झाला.
‘आपली लढाई आपणच लढूया, चला अहिंसेने वारी काढूया’ असे अन्य नारे पदाधिकाऱ्यांनी दिले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, खानदेश तसेच विदर्भातील मिळून हजारावर पदाधिकारी यात्रेत चालले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अनुदानवाढीचा मुद्दा प्रामुख्याने होता. तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, नव्या ग्रंथालयांना मान्यता, उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवा, ग्रंथालय परिषदेचे कामकाज, ग्रंथमित्र पुरस्कार, शासकीय समित्यांची स्थापना व अन्य मुद्दे उपस्थित करण्यात आले.
हेही वाचा… नागपूर जिल्ह्यात ‘चिकनगुनिया’ने डोके वर काढले; महिन्याभरात चार रुग्णांची नोंद
डॉ.कोटेवार म्हणाले की २०१२ पासून शासनाचे ग्रंथालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. आता ६० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. मिळणारे अनुदान तोकडे असल्याने ग्रंथालय कर्मचाऱ्यांची कुचंबना होत असल्याचे ते म्हणाले.