अनिल कांबळे
नागपूर : महाराष्ट्र सरकारने जरी महिला सुरक्षेला प्राधान्य दिल्याचा दावा केला असला तरी महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात चवस्था स्थानावर आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये सर्वाधिक कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, पती, मित्र, प्रियकरांसह ओळखीच्याच व्यक्तींचा समावेश आहे. राज्यात महिला-तरुणींवर नातेवाईक किंवा परिचित व्यक्तींनी सर्वाधिक २३३६ बलात्कार केल्याचे गुन्हे दाखल आहेत,अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून मिळाली आहे.
राज्य सरकार आणि महिला आयोग नेहमी महिलांवरील लैँगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेते. महिलांवरील लैंगिक स्वरुपाचे गुन्हे कमी व्हावे म्हणून प्रयत्न करते. मात्र, पोलिसांच्या नकारात्मक भूमिकेमुळे अशा गुन्ह्यात वाढ होत आहे. महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये सर्वाधिक कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक, ओळखीचे व्यक्ती, पती किंवा प्रियकरांचा समावेश असतो. अनेकदा महिला-तरुणींचे कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक व्यक्तींसोबत प्रेमसंबंध निर्माण होतात. कुटुंबातील व्यक्तींकडून अशा प्रेमसंबंधाला विरोध करतात. त्यामुळे कुटुंबियांच्या दबावापोटी बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. अनेक तरूणी, महिला बलात्कार किंवा विनयभंगासारख्या घटना समाजात बदनामी होऊ म्हणून सहन करतात. राज्यात २११ महिलांवर कुटुंबातील सदस्यांनी बलात्कार केला आहे. तर नातेवाईक, प्रियकर, जवळचा मित्र अशांकडून २१२५ महिला-तरुणींवर वेगवेगळी भीती दाखवून किंवा लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे. शेजारी, कुटुंबाशी सलगी असलेला व्यक्ती किंवा कामाच्या ठिकाणी ओळख झालेल्या व्यक्तींकडून ५६७ महिलांवर बलात्कार झाला आहे. म्हणजेच राज्यातील एकूण २९११ बलात्कार पीडित महिलांपैकी २३३६ महिलांवर बलात्कार करणारे आरोपी हे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि प्रियकराचा समावेश आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर: मोहर्लीच्या रस्त्यावर दोन वाघांचे दर्शन
विवाहित महिलांचे सर्वाधिक लैंगिक शोषण
लग्न झाल्यानंतर सासरी नांदायला आलेल्या विवाहित महिलांना सासरच्या कुटुंबातीलच दिर, भासरा, सासरा, भाऊजी अशा नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागले आहे. तसेच सासरकडील काही नातेवाईकांनी एकटेपणाचा किंवा धमकी देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच अन्य नातेवाईकांकडूनही महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्या आहेत. पती घरी नसताना अनेकींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन नातेवाईकांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या घटनांचाही समावेश या गुन्ह्यांमध्ये आहे.
बदनामीच्या भीतीपोटी तक्रारीस नकार
विवाहित महिलांवर बलात्कार केल्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक आरोपी हे सासरच्या कुटुंबातील आहेत. कुटुंबातील व्यक्ती, पती, नातेवाईक यांच्याकडून महिलांचे लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस जरी आल्या तरीही पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत नाहीत. कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती दाखवून अनेक विवाहित महिलांची समजूत घातल्या जाते. मात्र, बलात्काराच्या घटनानंतर अनेक महिला तक्रारीऐवजी थेट आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेत असल्याची नोंद आहे.