जरीपटक्यातील कस्तुरबानगरात एका काळात अक्कू यादवच्या नावाची दहशत होती. त्याने जवळपास २२ महिला-तरुणींवर अत्याचार केले. अनेक हत्याकांडांचा तो सूत्रधार होता. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी जिल्हा न्यायालयात शिरून अक्कू यादवचा खून केला होता. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या सत्य घटनेवर वेबसिरीज बनवली. तिचा विशेष ‘शो’ आज परसिस्टंट ऑडिटोरियममध्ये दाखवण्यात आला.यावेळी अक्कू यादवचा खात्मा करणाऱ्या महिलांसह, वस्तीतील इतर नागरिक, तत्कालीन पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि अभिनेत्री, अभिनेते उपस्थित होते.
दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या शोपूर्वी सर्व नागपूरकर आणि वस्तीतील महिलांचे आभार व्यक्त केले. या वेबसिरीजमध्ये अक्कू यादवसारखे लोक जन्माला येण्यासाठी जबाबदार असलेल्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
अक्कू यादवने अविनाश तिवारी आणि आशा भगत या दोघांचा खून केल्यानंतर कस्तुरबानगरात कशी दहशत पसरवली होती, याचे हुबेहूब चित्र यात रंगवले असून बघातानासुद्धा अंगावर काटा येतो.जरीपटका पोलीस ठाण्यातील भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अक्कू पैसे पुरवत होता. तसेच अक्कूच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आल्यास त्यांना पिटाळून लावण्यात येत होते. अक्कूला कुख्यात गुंड बनवण्यात पोलिसांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच अक्कू कोणाच्याही घरात शिरून अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिलांवर बलात्कार करीत होता. त्यामुळे महिलांनी त्याचा भर न्यायालयात खून केल्याचे यात दाखवण्यात आले आहे. यावेळी हत्याकांडाचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या २० ते २५ महिलांच्या मुलाखती, सामाजिक कार्यकर्त्या व्ही. चंद्रा, अक्कूचे मित्र, त्याच्या गुन्ह्यातील सहकारी आणि अत्याचार पीडित महिलांच्या मुलाखती दाखवण्यात आल्या. अस्सल नागपुरी भाषेत संवाद असल्यामुळे मालिकेत जिवंतपणा आला आहे.