बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद गावात आज दिमाखात उभे असलेल्या गणरायाच्या सिद्धीविनायक मंदिराची कथाच आगळीवेगळी आहे. उकिरडा, त्यात पुरलेले गावठी दारूचे ‘बॉक्स’, अनधिकृत सार्वजनिक शौचालय, संध्याकाळी दारूचा अड्डा, असे या जागेचे स्वरूप होते. त्याच जागेत हे देखणे मंदिर उभे करून ग्रामस्थांनी ‘गाव करी ते राव ना करी’ ही म्हण अक्षरशः सार्थ केली.
गावातील दानशूर भाविकांनी एकत्र येऊन हा अध्यात्मिक चमत्कार घडविला आहे. सवडद येथील शाळेच्या पाठिमागे असलेल्या या नरकासारख्या परिसराचा ११ वर्षांपूर्वी स्वर्ग झालाय. टुमदार देखणे मंदिर, आकर्षक मूर्ती, आजूबाजूला असलेली हिरवीगार वनराई, भक्तनिवास, असा परिसराचा कायापालट झाला आहे. त्याची पार्श्वभूमी रंजक आहे. तेव्हाच्या घाणीच्या साम्राज्यात येथे असलेल्या वटवृक्षामुळे येथे एक चौथरा उभारण्यात आला. गांवात गणेशोत्सवाची प्रचंड अहमहमिका असल्याने येथेही छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने गणेश स्थापना केली जायची. पाच वर्षे या ठिकाणी गणेशस्थापना व्हायची खरी पण विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकी दरम्यान वादंग ठरलेले! मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष संतोष गाडेकर यांनी यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले. नंतर येथे होणारी दारू विक्री बंद करण्यात आली. याच चौथऱ्यावर छोटेखानी मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
आणि साकारले मंदिर!
भोजराज गाडेकर, रविंद्र आंभोरे, रामदास जैवाळ, राजेंद्र देशमुख, अशोक गाडेकर, विलास आंभोरे, तुषार देशमुख आदींच्या मदतीने गणेश मंदिर उभारणीचा निर्णय घेण्यात आला. प्रारंभी गणरायाची साध्या दगडी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरले. मात्र साखरखेर्डा येथील विकास इंगळे या भाविकाने मार्बलची मूर्ती देण्याचे कबूल केले, पण मूर्तीला साजेसे मंदिर उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. मंदिराचे प्रशस्त बांधकाम करण्यासाठी पाच सहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. एवढा पैसा कसा जमा होईल? या चिंतेत भाविक पडले. मात्र अनेक हात दानासह धाऊन आले. त्यामुळे झपाट्याने मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेले. जोधपूरवरून पन्नास हजार रुपयांची मूर्ती विकास इंगळे यांनी पोहोच करून दिली. यानंतर १२ डिसेंबर २०१२ ला मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.
गणेश जयंतीनिमित्त येथे तिन दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम पार पडतात. महाप्रसाद वितरणाने सांगता होते. महाप्रसाद वितरण करण्यात येते. परिसरात माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या निधीतून भक्त निवास बांधण्यात आले. करोनाच्या टाळेबंदीत अनेक आदर्श लग्न सोहळे येथे पार पडले आहेत.
हेही वाचा – विदर्भात निघणार झाडू यात्रा; कोण व कशासाठी काढणार, वाचा…
मान्यवरांच्या भेटी
या सिद्धीविनायकाला शिवशाहीर विजय तनपुरे, भारूडसम्राट निरंजन भाकरे, शाहीर इश्वर मगर, सज्जनसिंग राजपूत, अभय मासोदकर, यांचे कार्यक्रम झाले आहे. सांगलीचे शाहीर देवानंद माळी, व्याख्यानकार अभय भंडारी वीटा, आदी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. याशिवाय अंधश्रद्धा निर्मुलन, योगशिबीर, रक्तदान शिबीर, सर्प-जनजागृतीचे कार्यक्रम पार पडले आहेत. चतुर्थीला येथे सकाळी चारला शेकडो महिला काकड आरती करून पूजाअर्चना करतात.
गणेशाच्या बाजूला ‘गजानन’
अलिकडे मंदिराच्या आवारात शेगावच्या गजानन महाराजांचेदेखील मंदिर उभारण्यात आले आहे. गजानन महाराजांचे भक्त गंगाभारती यांची ही जन्मभूमी आहे.