यवतमाळ : ‘इतकेच मला सरणवार जाताना कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…’कविवर्य सुरेश भटांच्या कवितेतील या ओळींचा प्रत्यय रविवारी येथील नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात आला. गँगरीन झालेल्या एका निराधार वृद्घेने उपचारात साथ सोडली. बेवारस असलेल्या या वृद्घेला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे मन गहिवरून आले. आपल्या विवंचनेत परराज्यातील एक वृद्ध महिला यवतमाळ शहरात निराधार जगत होती. तिची ही वास्तविकता काही सुजाण नागरिकांना कळताच त्यांनी तिला नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात दाखल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणी आप्तस्वकीय नसल्याने तिला या केंद्रात आधार मिळेल हा विश्वास दाखल करणाऱ्या नागरिकांना होता. त्यांनी केंद्राचे संचालक संदीप शिंदे यांना तिची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्या वृद्घेच्या पायाला गँगरीन झाला होता. अशा अवस्थेत ती दिवस काढीत होती. या केंद्रात तिला आधार मिळाल्यानंतर केंद्राच्या नंदिनी शिंदे यांनी तिच्या जखमी पायाची काळजी घेतली. आठ दिवस तिच्यावर उपचार सुरू होते.

हेही वाचा >>> बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना नावापुरत्याच! पाच वर्षांत देशात ३,२५४, राज्यात १८५ प्रकरणे

परंतु, हा त्रास असह्य झाल्याने या आजारातील तज्ञांच्या उपचाराची तिला गरज होती. त्यानुसार तिला २४ ऑगस्टला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारात तिने साथ सोडली. त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी शोधपात्रिका प्रसिद्ध करून तिच्या नातेवाईकांचा शोध चालविला. त्यास अपयश आले. अखेर तीन दिवसांनी नंददीप फाऊंडेशच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेत रविवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. अवधूतवाडीचे पोलीस हवालदार अनिल सुरपाम व कुणाल पांडे यांच्या सहकार्याने ही क्रिया पार पडली.

हेही वाचा >>> सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल आठ दिवस बंद

यावेळी नंदादीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, भोजराज गजभिये, अक्षय बानोरे, कृष्णा मुळे, स्वप्नील सावळे, कार्तिक भेंडे, निशांत सायरे तसेच विक्की एकोणकार उपस्थित होते. ही वृध्द महिला आपला त्रास आणि वेदना घेऊन जगत होती. कुटंबिय सोबत नव्हते ती निराधार होती. त्यामुळे ‘मरणाने केली सुटका’ या कवितेतील ओळी तिच्या कहाणीला समर्पक ठरतात, अशा भावना तिला निरोप देताना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of the helpless old women death nrp 78 ysh
Show comments