भंडारा : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण वाढत चाललेला आहे. त्यातूनच अनेक विद्यार्थी टोकाची भूमिकादेखील घेत आहेत. अशातच, आज इंग्रजी विषयाचा पेपर पाहताच एक विद्यार्थिनी वर्गखोलीतच बेशुद्ध झाली. ही घटना येथील ज. मु. पटेल महाविद्यालय परीक्षा केंद्रावर घडली. या प्रकारानंतर परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली होती.
आज इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर सकाळी ११ वाजतापासून सुरू झाला. नूतन कन्या महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी ज. मु. पटेल महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी पोहचली. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या. प्रश्नपत्रिका पाहताच तिला भोवळ आली आणि ती वर्गखोलीतच बेशुध्द होऊन पडली. तिला ताबडतोब जवळील निर्वाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इतर विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाले. काही काळ परीक्षा केंद्रावर गोंधळाची स्थिती होती. या प्रकारानंतर प्रशासनाने कॉपीमुक्त अभियानासोबतच ताणमुक्त अभियान राबवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.