यवतमाळ: राज्यातील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी २०२३ चे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून शासकीय सुविधांपासून वंचित आहेत. मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नसल्याची बाब काही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणूनही शासनस्तरावर उपाययोजना न झाल्याने विद्यार्थी खिशातून खर्च करत असल्याचे चित्र आहे.
भोजन निविदा २०१४ पासून काढल्या नसल्यामुळे आणि जुने भोजनाचे दर ठेकेदारांना परवडत नसल्याने विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन मिळत असल्याची ओरड सुरू आहे. विद्यार्थ्यांना दुध, अंडी, फळं, नाश्ता असा सकस आहार देण्याचे नियोजन असताना समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये निकषांप्रमाणे भोजन मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. निर्वाहभत्ता, ड्रेसकोड, स्टेशनरी यासाठी विभागाकडे निधी नसल्याने विद्यार्थी या सुविधांपासूनही वंचित आहेत. कोरोनानंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अद्यापही नवीन चादर, ब्लँकेट आदी साहित्याचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून वसतिगृहांमध्ये वॉटर कुलर बसविण्यात आले. मात्र त्यानंतर अनेक ठिकाणी त्याची देखभाल, दुरूस्ती न झाल्याने बहुतांश वॉटर कुलर धुळखात पडले आहेत. हीच स्थिती इन्वहर्टरच्या बाबतीत आहे. अनेक वसतिगृहात वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा अंधारात चाचपडत राहावे लागते. समाजकल्याण अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश, छत्री, रेनकोट, लॅब ॲप्रन, प्रोजेक्ट रिपोर्ट व शैक्षणिक सहल यांची देयके थकीत असल्यामुळे विद्यार्थी या साहित्याच्या लाभापासूनही वंचित आहेत.
हेही वाचा… राज्यासह देशातील वातावरणात मोठे बदल; ऐन हिवाळ्यात थंडीसह ऊन आणि पाऊसही
समाजकल्याण विभागामार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दोन लाखांची पुस्तके खरेदी करण्याची तरतूद आहे. मात्र या पुस्तकांची खरेदीच होत नसल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तके उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा काढणे बंधनकारक असताना अजूनपर्यंत विमा काढण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी व्यायामाची सुविधा व्हावी काही मोजक्याच वसतिगृहांमध्ये जिमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वसतिगृहांमध्ये टिव्ही संच, क्रीडा साहित्याचा पुरवठाही बंद आहे. विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्याटिमध्येसुद्धा अद्याप वाढ झालेली नाही.
पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात इयत्ता अकरावीपासून राहून शिक्षण घेत असलेल्या सुधीर मुडुमडीगेला या विद्यार्थ्याने, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये शासनाचे शासकीय वसतिगृहांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समस्यांकडे लक्ष देवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी त्याने केली.
सर्वच वसतिगृहांमध्ये सुविधा आहेत– समजाकल्याण अधिकारी
यवतमाळ येथील समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी जिल्ह्यात समाजकल्याण विभागामार्फत १८ वसतिगृहे चालविली जात असल्याचे सांगितले. शासनाच्या निर्देशांप्रमाणे सर्वच वसतिगृहांमध्ये सुविधा पुरविल्या जात आहेत. निधीअभावी विद्यार्थ्यांचा निवार्ह भत्ता प्रलंबित आहे. स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही उपलब्ध करून दिली जातात. नुकतीच सिव्हील सर्व्हिसेससंदर्भात पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली, अशी प्रतिक्रिया या समाजकल्याण अधिकारी चव्हाण यांनी दिली.