गडचिरोली : शिवणकाम करणाऱ्या महिलेच्या शिक्षक पतीने घरच्या ‘चेजिंग रुम’ला छिद्र पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार देसाईगंज येथे १५ मे रोजी उघडकीस आला. एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, नंदकिशोर भाऊराव धोटे (४५, रा. कुरखेडा, ह.मु. देसाईगंज) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. तो कुरखेडा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे. देसाईगंज येथे स्वत:च्या घरी त्याची पत्नी शिवणकाम करते. त्यामुळे पत्नीकडे महिलांची रेलचेल असते. त्यांनी घरीच कपडे बदलण्यासाठी छोटी खोली तयार केलेली आहे.
हेही वाचा >>> जेवणाच्या पंगतीतून उठवले म्हणून चाकूहल्ला
या खोलीच्या भिंतीला छिद्र पाडून नंदकिशोर धोटे हा मोबाईलद्वारे महिलांचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण करत असे. यासंदर्भात एका महिलेच्या लक्षात येताच तिने देसाईगंज ठाणे गाठून फिर्याद दिली, त्यानंतर नंदकिशोर धोटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे देसाईगंज शहरात एकच खळबळ उडाली आहे.