नागपूर: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात घट होत असताना मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ होत आहे. हे तापमान किमान पाच दिवस तरी असेच चढते राहील.
कोकण विभागात अनेक ठिकाणी कमाल तापमानात ३५ अंशाच्या वर वाढ झाली आहे. तर मुंबईत देखील सांताक्रूझ, कुलाबा, डहाणू आणि रत्नागिरी येथेही तापमान ३५ अंशाच्या वर नोंदवण्यात आले आहे. कमालच नाही तर किमान तापमानातही वाढ होत आहे. गेला आठवडाभर राज्यात इतर ठिकाणी किमान तापमान उतरले असताना तसेच थंडीची जाणीव वाढलेली असताना मुंबई व कोकण विभागात मात्र दिलासा मिळताना दिसत नाही. गुजरातवर प्रत्यावर्तीय चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा… वर्धा: दिवाळीसाठी शेतकऱ्यांची लगबग; ८ दिवसात १६ कोटींची उलाढाल
हे वारे समुद्रावरून हवा घेऊन मध्य भारताजवळ आदळतात. त्यातच कोरड्या वाऱ्यांची भर पडते. त्यामुळे २५ ऑक्टोबरनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये गारवा निर्माण झाला आहे. परिणामी जळगावचे किमान तापमान १० ते ११ अंशांपर्यंत खाली उतरले आहे. कोकण आणि मुंबईत मात्र उच्च दाबाचे हवेचे क्षेत्र आहे. ही हवा उष्णता धारण केलेली आहे. त्यामुळे मुंबईचे कमाल तापमान सातत्याने चढत आहे.