सुमित पाकलवार
गडचिरोली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवारांच्या बंडखोरीची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी यावर प्रतिक्रिया देताना अजितदादांची दहशत असल्याचे सांगितले होते. गडचिरोलीच्या जंगलातही एका ‘अजित’ची दहशत असून त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तेथे दोन गट पडले आहे. यामुळे वयोवृद्ध ‘रुपा’वर एकाकी आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. हा अजित म्हणजे ‘कमलापूर हत्तीकॅम्प’मधील हत्ती असून त्याच्या दहशतीची प्राणीप्रेमींमध्ये कायम चर्चा असते.
राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे आहे. मागील काही वर्षात पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले. या कॅम्पमधील हत्तींना पाहण्यासाठी आजही मुंबईपासून पर्यटक येतात. मधल्या काळात येथील हत्ती अंबानींच्या प्राणी संग्रहालयात हलवण्यावरून वादंग उठले होते. या हत्तीकॅम्पमध्ये सध्या अजित नावाच्या हत्तीची दहशत असल्याचे पाहायला मिळते. २९ वर्षाच्या अजितने २०१३ मध्ये एका माहूताला ठार केले होते. अधूनमधून त्याच्या बंडखोरीचे किस्से कानावर येतच असतात.
हेही वाचा >>>हवामान खात्याने दिला ‘या’ राज्यांना पुराचा इशारा
हेही वाचा >>>नागपूर: मंदिर वस्त्रसंहिता लागू करणे मंदिर व्यवस्थापनाला अडचणीचे, जाणून घ्या कारणे…
दोन वर्षांपूर्वी या अजितने नागझिरा अभयारण्यावरून आणलेल्या रुपा नावाच्या वयोवृद्ध हत्तीनीवर हल्ला केला होता. तेव्हापासून ती कळप सोडून एकाकी जीवन जगत आहे. हत्तीकॅम्पमध्ये अजित, रुपा, बसंती, राणी, मंगला, प्रियांका, गणेश आणि लक्ष्मी असे एकूण आठ हत्ती आहेत. या सर्वांमध्ये अजितची प्रचंड दहशत असून कॅम्पमधील कर्मचारी देखील अजितला कळपापासून लांब ठेवतात.