नागपूर : घरफोडी करून ३३ तोळे सोने चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलीस उपायुक्तांच्या सायबर पथकाच्या मदतीने हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. १५ दिवस सतत तपास आणि ४५० ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासल्यानंतर आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३३० ग्रॅम सोन्यासह २४ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी लग्न समारंभ असलेल्या परिसरातील बंद घरांची टेहळणी करून चोरी करीत होते. त्यांच्याकडून आतापर्यंत ८ गुन्ह्यांचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. शुभम ऊर्फ मुन्नी चंद्रशेखर मून (२५) रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा आणि राकेश ऊर्फ ढोक सुनील लखोटे (३४) रा. शताब्दीनगर, रामेश्वरी रिंगरोड, अजनी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. राकेश हा पोलीस अभिलेखावरील सराईत चोर आहे. पोलिसांनी नरेंद्र बळीराम कोहाड (६३) रा. सूर्योदयनगर, रेवती अपूर्वा सोसायटी, हुडकेश्वर रोडच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला होता. कोहाड हे वेकोलिचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.

हेही वाचा >>>बारावीच्या निकालात कॉपीबहाद्दर गोंदिया जिल्हा नागपूर विभागात अव्वल

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी कोहाड कुटुंब यांच्या घरासमोर राहणारे रमेश घोरमाडे यांच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ हुडकेश्वर मार्गावरील स्वामी समर्थ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास कोहाड कुटुंब घराला कुलूप लावून स्वागत समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. या दरम्यान अज्ञात आरोपीने घरफोडी करून ३३० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख ४५ हजार रुपये असलेली तिजोरीच चोरून नेली होती. घटनेच्या तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी आसपासच्या परिसरातील ‘सीसीटीव्ही’ तपासण्यात आले. खबऱ्यांनाही कामावर लावण्यात आले. दरम्यान, माहिती मिळाली की, आरोपी शुभम व राकेश हे सध्या खूप पैसे उधळत आहेत. माहितीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. चौकशीत दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला.

हेही वाचा >>>नागपूरहून आमल्याला रेल्वेने जाताय? आधी हे वाचा…; इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे तब्बल सात दिवस…

सराफालाही केले आरोपी

सखोल चौकशी केली असता आरोपींनी चोरीचे दागिने सुरभी ज्वेलर्स मालक संजय महादेव गुरव (५८) रा. चक्रधरनगर याच्याकडे विकल्याची माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी चोरीचा माल खरेदी करणाऱ्या संजय गुरव यालाही आरोपी केले आहे. चौकशीत संजय गुरवने चोरीचे दागिने वितळवून इतवारी येथील आरडी गोल्ड टेस्टिंग दुकानाचे मालक दीपक साळुंखेला विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ साळुंखेकडून सोने जप्त केले. आरोपींकडून सोने विकून मिळालेले २३ लाख रुपयेही जप्त केले.

हेही वाचा >>>रानडुकराची शिकार करताना वाघीण जखमी; टीपेश्वर अभयारण्यातील घटना

८ गुन्हे उघडकीस

राकेशची कपड्यांचे दुकान आहे. मात्र ते व्यवस्थित चालत नव्हते. तर आरोपी मून याला पैशांची आवश्यकता होती. अशात दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आरोपींकडून ८ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. दोन्ही आरोपी लग्न समारंभ असलेल्या परिसरातील बंद घरांची रेकी करून चोरी करीत होते. आरोपींकडून आणखी उलगडा होण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The theft of gold was revealed in nagpur adk 83 amy