लोकसत्ता टीम
अकोला: मोबाइल दुकानाच्या गल्ल्यातून पैशांची चोरी झाली. दुकानदाराने तक्रार दिल्यावर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत चोरट्याला गजाआड केले. मात्र, चोरट्याच्या कबुली जबाबाने चक्क फिर्यादी दुकानदाराचेच पितळ उघळे पडल्याचा अजब प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे.
शहरातील गांधी मार्गावर मनोज नंदलाल अग्रवाल (४२) यांचे मोबाइल व्यवसायाचे दुकान आहे. ४ जून रोजी सायंकाळी त्यांनी मोठे भाऊ रतन अग्रवाल यांना दुकानात बसवून बाजूला गेले होते. त्यावेळी दुकानात दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी सेठला यांना बोलावून आणा, मोबाइल रिचार्ज करायचा असल्याचे सांगितले. त्यांना बोलावण्यासाठी रतन अग्रवाल बाहेर पडले. त्यावेळी त्या दोन अनोळखी व्यक्तींनी ५० हजार चोरल्याची तक्रार अग्रवाल यांनी केली.
हेही वाचा… नागपूर : अपहरण करून तरुणीवर बलात्कार; सराईत गुन्हेगाराला अटक
चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी काही तासांत मितेश अमर गिरी (२०) याला अटक केली. पोलीस चौकशीमध्ये त्याने दुकानातून ५० नव्हे तर १० हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. दारूच्या नशेत चोरीचे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. चोरट्याच्या कबुलीमुळे तक्रारदाराचे खोटे मात्र पकडले गेले.