लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम: आई-वडिलांकडून प्रेरणा घेत जिद्द, चिकाटीने सराव केला आणि तीन भावंडांनी पोलीस होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. हा संघर्षमय प्रवास नंदा वानखडे, वैभव वानखडे आणि शीतल वानखडे यांच्यासाठी कठीण होता. ते मूळचे चिखली सरनाईक ता. रिसोड येथील रहिवासी आहेत. तिन्ही भावंडांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

रिसोड तालुक्यातील चिखली येथील लोडूजी वानखडे व वच्छलाबाई वानखडे या दाम्पत्याला पाच मुली व एक मुलगा. आई-वडील स्वत: निरक्षर, पण मुलामुलींनी शिकून मोठं व्हावं, यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आई-वडिलांचा संघर्ष नंदा, शीतल व वैभवने जवळून अनुभवला. त्यांच्या कष्टाचे चीज झाले पाहिजे म्हणून बारावीनंतर नंदाने वाशीम येथे पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले आणि पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वीही ठरली.

हेही वाचा… भंडारा: तरुणाने वाढदिवसाला तलवारीने कापले तब्बल ११ केक, व्हीडिओ व्हायरल

बहीण पोलीस झाल्याचे पाहून वैभवनेही पोलीस भरतीची तयारी सुरू केली. सुरुवातीच्या एक, दोन प्रयत्नात त्याला अपयश आले; मात्र त्याने खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले आणि चंद्रपूर येथील पोलीस भरतीत तो यशस्वी झाला. बहीण व भावाच्या पावलावर पाऊल ठेवत शीतलनेही वाशीम येथे सराव केला आणि यंदाच्या पोलीस भरतीसाठी नवी मुंबई गाठली. या भरतीचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये शीतलनेही यशाला गवसणी घातली. आप्तस्वकियांसह गावकऱ्यांकडून या भावंडांचे कौतुक होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The three siblings in the family achieved success by becoming a police pbk 85 dvr
Show comments