शेतात फवारणी करणाऱ्या युवकावर वाघाने अचानक झडप घेतली. मात्र, युवकाने मोठ्या धाडसाने स्वतःचा बचाव केला. यात वाघाचा पंजा त्याच्या पाठीवरील पंपाला लागला. चवताळलेल्या वाघाने पुन्हा त्या युवकावर उडी घेतली. दरम्यान, आसपासच्या लोकांनी आरडाओरड केली आणि वाघ पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून त्या युवकाचा जीव वाचला. विकास भोयर असे त्या नशीबवान युवकाचे नाव असून ही घटना आरमोरी तालुक्यातील विहीरगाव (कुकडी) येथील शेतशिवारात घडली.
विहीरगाव (कुकडी) येथील रहिवासी योगाजी भोयर यांनी सिर्सी साझ्यातील नरोटीचक परिसरातील शेतात उन्हाळी धानपीक व भाजीपाल्याची लागवड केली आहे. त्यामुळे भोयर कुटुंब शनिवारी सकाळच्या सुमारास धानपिकावर कीटकनाशक फवारणी करण्यासाठी कोरेगाव मार्गावरील आपल्या शेतात गेले होते. दरम्यान, योगाजी भोयर यांचा मुलगा विकास पाठीमागे फवारणी पंप लावून शेतात फवारणी करीत होता.
हेही वाचा- वर्धा :येथे साजरी होते विनारंगांची ‘लठमार’ होळी, देशातील प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबाचा सहभाग
अचानक गवताच्या आड असलेल्या वाघाने विकासच्या दिशेने धाव घेतली. वाघ आपल्या दिशेने धावत येत असल्याचे पिंटूच्या लक्षात येताच त्याने त्या बांधीतून पळ काढला. वाघाने विकासवर झडप घातली खरी मात्र, त्याच्या पाठिमागे फवारणी पंप असल्याने वाघाचा पंजा पंपाला स्पर्श करून गेला. वाघाने दुसऱ्यांदा विकासवर झडप घेतली. मात्र, जवळच असलेल्या आई वडिलांनी व आसपासच्या लोकांनी वाघाच्या दिशेने धाव घेत त्याला पळवून लावले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.