अकोला : माती वाहून नेणारा ट्रक उलटला आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा जीव गेल्याची घटना बाळापूर जवळ घडली. वीटभट्टीसाठी खोदून मातीची ट्रकने वाहतूक करण्यात येत होती. मार्गात ट्रक उलटल्याने मातीचा ढिगारा अंगावर पडून इफराजखान इलियासखान (२०, रा.कालेखानीपुरा, बाळापूर) याचा मृत्यू झाला.
मृतकाचा भाऊ अन्वर खान ईलीयास खान यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मातीचा ट्रक क्रमांक (एमएच ३० एल ०६८२) चा चालक अत्ताऊल्लाखाँ सईदखान (३०) याने वाहन निष्काळजीपणे चालविल्याने वाहन उलटले. ट्रकमध्ये भरलेली माती खाली पडलेल्या युवकाच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरल्यावरून बाळापूर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.