अकोला: चातुर्मास व तुळशी विवाह समाप्तीनंतर आता लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. आगामी सहा महिन्यात लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त मुहूर्त असून बाजारपेठेत उलाढाल वाढणार आहे.
सणासुदीचा काळ यंदा उत्साहात पार पडला. त्यानंतर घरोघरी तुळशी विवाहदेखील भक्तिभावात लावण्यात आले. आता तुळशी विवाहाच्या समाप्तीनंतर उपवर-वधू घरांमध्ये लगीनघाई सुरू झाली. लग्नाचा बार उडायला सुरुवात झाली आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा लग्नाचे मुहूर्त जास्त आहेत.
हेही वाचा… ओखा-मदुराई-ओखा विशेष रेल्वेला मुदतवाढ
आगामी नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. त्यामुळे आतापासून तयारी सुरू झाली. नव्या वर्षात लग्नांचा थाट जून महिन्यापर्यंत राहणार आहे. लग्नासाठी खरेदीला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळीनंतर देखील उत्साह कायम आहे. लग्नासाठी कार्यालय, सभागृह, निमंत्रण पत्रिका, बिछायत, सजावट, वाद्यवृंद, घोडेवाला, फेटेवाला, गुरुजी आदींची बुकिंग जोमात सुरू आहे.