नागपूर : जंगलात किती प्राणी एकत्र येतात, ते महत्त्वाचे नाही, मात्र ते वाघाची शिकार करू शकत नाहीत. कारण वाघाचेच जंगलावर राज्य असते. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांनी कितीही एकजूट केली तरी ते त्यांना पराभूत करू शकणार नाहीत, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकजूट करीत आहेत. मात्र जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. डॉ. आशीष देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. पाटण्यात विरोधकांची २३ जूनला बैठक आहे. २०१९ मध्येही असाच प्रयत्न त्यांनी केला होता. त्यावेळी काँग्रेसला ४८ जागा मिळाल्या. व्यासपीठावर मात्र ५५ नेते होते. यापेक्षा मिळालेल्या जागा कमीच होत्या, असा टोला फडणवीस यांनी लगावला. आपला नेता कोण याबाबत विरोधकांमध्येच एकमत नाही. कोणीही कोणाला नेता मानण्यास तयार नाही. माझे विरोधकांना खुले आव्हान आहे की त्यांनी निवडणुकीपूर्वी आपला नेता कोण हे जाहीर करावे. महाराष्ट्रातल्या विरोधकांमध्येही नेता कोण हा प्रश्न आहे हेच चित्र आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्यात जनता भाजप-शिवसेना युतीच्या पाठीशी आहे. खरी शिवसेना आमच्या शिंदे यांची, तर ठाकरे यांच्याकडे आहे ती शिल्लक सेना, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
अडीच वर्षे उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत म्हणून राज्याचे नुकसान झाले, हे शरद पवार यांनी लिहून ठेवले आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी आमच्या जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.