भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर शनिवारी बुलढाण्यात प्रथम आगमनाप्रसंगी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत झाले. हाच जोश आपल्या भाषणातून कायम ठेवत प्रदेशाध्यक्षांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आगामी खासदार भाजपचाच असेल, असा दावा केला. याचबरोबर, जिल्ह्यातील सातही आमदार भाजपचेच हवे, असेही ठणकावून सांगितले. जिल्हापरिषदेत बहुतम, किमान ९० टक्के पालिका अध्यक्ष व सरपंच भाजपचेच, असे भाकित करीत त्यांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
हेही वाचा – यवतमाळ : …अन् कृषिमंत्र्यांनी शेताच्या बांधावर घेतला भाजी-भाकरीचा आस्वाद
भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात ‘दोन हाती’ प्रयत्नामुळे आपले सरकार सत्तेत आले. त्या दोघांनीच ५० आमदार फोडले हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे किमान ५० कार्यकर्ते फोडायला हवे, असे थेट आवाहनच बावनकुळे यांनी यावेळी केले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा. बूथ सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे आ. बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा – अमरावती : कुपोषण आणि बालमृत्यूसाठी सर्वच राज्यकर्ते जबाबदार – अजित पवार
‘ते’ आले की लोकसभा जिंकलीच!
केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्यासारख्या सक्षम नेत्याची बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच आपल्या २१ कलमी कार्यक्रमसह जिल्ह्यात येणार आहे. ते आले की लोकसभेची निवडणूक अर्धी जिंकलोच समजा. इतका हा ताकदीचा माणूस आहे, असे ते म्हणाले.
आ. कुटे यांची भाकिते
दरम्यान, अत्यंत प्रभावी व संयत भाषण करणारे आ. संजय कुटे यांनी नगर पालिकेच्या निवडणुका सप्टेंबर तर जिल्हा परिषदेच्या ऑक्टोबरमध्ये होतील, असे भाकित वर्तविले. अमरावती पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार येत्या दहाएक दिवसात ठरेल, असेही त्यांनी सांगितले.