नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा वापर वाढला असून दर आठवड्यात आरोपींकडे पिस्तूल सापडल्याचे गुन्हे दाखल होत आहे. अशाच प्रकारे सोमवारीसुद्धा संशयावरून पकडलेल्या एका आरोपीच्या खिशातूनच चक्क पिस्तूल निघाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना मस्कासाथ मार्गावरील बंगालीपंजा येथील मेमन जमात हॉलच्या गल्लीत दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या बसलेले दिसले. पोलीस तेथे पोहोचले असता एक आरोपी पळून गेला तर दुसऱ्या आरोपीला सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आढळली. गणेश विश्वनाथ तलवारे (३०, चांद मोहल्ला, बंगालीपंजा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचा सहकारी फहीम उर्फ गुड्डू शेख (बंगालीपंजा) हा फरार आहे.
हेही वाचा – चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड
पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मागील आठवड्यात याच पद्धतीने एका आरोपीकडेदेखील पिस्तूल सापडले होते. तो आरोपी साथीदारांसोबत व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी बाहेरील राज्यातून नागपुरात आला होता. सर्रासपणे पिस्तूल घेऊन गुन्हे करण्यासाठी फिरणाऱ्या आरोपींमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच गुन्हे शाखेची पाच-पाच पथके कार्यरत असल्यानंतरही पिस्तूल वापरणाऱ्या आरोपींपर्यंत त्यांना पोहोचता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.