राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक सरपंच व सदस्य निवडून आले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात मात्र काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे या पराभवाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे रवी खंबालकर यांनी भाजपच्या सुरेश लंगडे यांचा पराभव केला.
फडणवीस यांनी फेटरी गाव दत्तक घेऊन गेल्या काही वर्षात या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील फेटरीमध्ये अनेक उपक्रम राबवले. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी काँग्रेसने बाजी मारली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटरीमध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र तरीही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कुंदा राऊत याबाबत म्हणाल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटरी गाव दत्तक घेतले, मात्र गेल्या चार-पाच वर्षात ते गावात आलेच नाही. अमृता फडणवीस येतात आणि भाषण देऊन जातात. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मात्र लक्ष देत नाही. गेल्यावेळी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र कर्जमाफी झाली नाही. त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही.