चंद्रपूर : माणूस महत्त्वाचा की वाघ महत्त्वाचा, वाघाला शूट करण्याचे आदेश द्या, जिल्हा प्रशासनाला हा शेवटचा इशारा आहे. ग्रामस्थांनी वाघाला ठार केले, विष प्रयोग केला तर त्याला ग्रामस्थ जबाबदार राहणार नाही, हे वन मंत्री यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला.
सावली तालुक्यातल्या वाघोली- बुटी गावात वाघाच्या हल्ल्यात प्रेमिला रोहनकर ही महिला ठार झाली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना तीव्र संताप व्यक्त केला. तात्काळ वाघाला ठार मारावे अन्यथा वाघ मृत आढळल्यास ग्रामस्थांना जबाबदार धरू नका असा निर्वाणीचा इशारा वडेट्टीवारांनी दिला.
याच गावात गेल्या पंधरा दिवसात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार झाल्याची ही दुसरी घटना असून त्यामुळेच ग्रामस्थ संतापले आहेत. दरम्यान या क्षेत्राचे आमदार वडेट्टीवार यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागावर टीका केली.