नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी चातकाप्रमाणे वाट बघत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या चेहऱ्यांवर हसू फुलले. सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. अखेर ‘मॅट’ने चार आठवड्यात पदोन्नती देण्याचे आदेश दिले. ‘मॅट’च्या आदेशाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदी-आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी पाठपुरावा केला, हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण १०२ आणि १०३ तुकडीचे सहायक पोलीस अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नती मिळण्यासाठी पात्र आहेत. मात्र, कनिष्ठ तुकडीतील काही अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यामुळे दोन्ही तुकडीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीस खिळ बसली होती. कनिष्ठ आणि वरिष्ठ तुकडीने मॅटमध्ये प्रकरणे दाखल केले होते. न्यायाधीन प्रकरणामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने पदोन्नती देण्यास विलंब केला होता. पदोन्नतीस पात्र असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांची भेट घेतली. तरीही पदोन्नतीतील तिढा सुटत नव्हता. पदोन्नती देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालय सकारात्मक होते तर न्यायाधीन प्रकरणामुळे निर्णय घेता येत नव्हता. १०२ तुकडीतील अर्धेअधिक अधिकारी पोलीस निरीक्षक पदावर रुजू आहेत तर उर्वरित १६० अधिकारी अजूनही सहायक निरीक्षक म्हणून त्यांच्या हाताखाली काम करीत आहेत. तसेच १०३ तुकडीतील अधिकारी पदोन्नती मिळेल या आशेवर होते. पदोन्नत्तीसाठी पात्र असतानाही दोन वर्ष सहायक निरीक्षक पदावर काम करावे लागत असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये कमालीची खदखद होती. अनेकदा अधिकारी व्हॉट्सअ‍ॅपवर खासगी ग्रूपमध्ये आपली भावना आणि संताप व्यक्त करीत होते. वारंवार पोलीस महासंचालक आणि गृहमंत्रालयात चकरा मारून पोलीस अधिकाऱ्यांचा जीव अक्षरशः मेटाकुटीस आला होता. मात्र, आता मॅटने चार आठवड्यात पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा – पांढऱ्या सोन्याच्या दरावर ‘संक्रांत’, संतप्त शेतकऱ्यांकडून कापसाची ‘होळी’; आर्वी बाजार समितीत…

समाजमाध्यमांवरून शुभेच्छा

गेल्या दोन वर्षांचा संघर्षमय काळ लोटल्यानंतर पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळत असल्यामुळे १०३ तुकडीतील सहायक निरीक्षकांनी एकमेकांना समाजमाध्यमातून शुभेच्छा दिल्या. नव्या वर्षात पदोन्नतीचे गिफ्ट भेटल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा – नागपूर: महसूल कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाचे कारण काय?

५०६ अधिकारी होणार पोलीस निरीक्षक

राज्य पोलीस दलातील १०३ तुकडीतील ५०६ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. पोलीस दलातील सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वाणवा होती. मात्र, आता पाचशेपेक्षा जास्त पोलीस निरीक्षकांची भर पडणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The way for the promotion of api was cleared mat orders to be promoted in four weeks adk 83 ssb
Show comments