नागपूर: राज्याच्या उत्तरेकडील भागात थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातही किमान तापमानाचा पारा खाली घसरत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता हिवाळा सुरू झाल्याचे जाणवत आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली आहे. किमान तापमान १५ अंश सेल्सिअस खाली गेले असून सर्वाधिक उष्ण असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसवर गेल्याचे पाहायला मिळाले.
आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पहाटे गारठा तत्र ऊन असल्याचे दिसून येत आहे. धुके आणि दव पडल्याचे चित्र देखील दिसून येत आहे. येत्या काही दिवसात थंडीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
‘या’ भागात पावसाचीही शक्यता
दरम्यान, त्याचवेळी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, आंध्र प्रदेश या राज्यांसह आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये पावसाची हजेरी असणार आहे.