लोकसत्ता टीम
गोंदिया: अर्जुनी मोरगाव, नगरपंचायत आणि तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या अर्जुनी येथे भरणारा आठवडी बाजार चिखलाच्या साम्राज्यात भरतो आहे. केवळ कमिशन खोरीच्या नादात असणारे येथील पदाधिकारी आणि अधिकारी यांना याचा काहीच सोयर सुतक नाही.
२०१५ ला या ग्रामपंचायतचे नगर पंचायत मध्ये रूपांतर झाले. नगर पंचायतचा थेट राज्य शासनाची संपर्क येतो. भरपूर प्रमाणात नगरपंचायतींना निधी मिळतो. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेले अर्जुनी शहर विकासाच्या प्रतीक्षेत होते.नगरपंचायत झाल्याने शहराचा कायापालट होईल अशी आशा नागरिकांना होती. आठ वर्षे लोटली मात्र नागरिकांचा भ्रमनिरास सुरू आहे. ही नगरपंचायत सध्या आठवडी बाजारातील चिखलाच्या साम्राज्याने चर्चेचा विषय झाली आहे. शहराचा विकासात्मक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून नागरिकांना उत्तम सुविधा देणे नगरपंचायतचे कर्तव्य , मात्र दर शनिवारला भरणारा आठवडी बाजार पायाभूत सुविधांच्या अभावी भरवीला जातो.
आणखी वाचा-वंदे भारत एक्सप्रेसला अचानक प्रतिसाद वाढला, जाणून घ्या कारण…
अर्जुनी शहराच्या मध्यभागी बाजारवाडीची नियोजित जागा उपलब्ध आहे.मात्र या नियोजित जागेवर धनदांडग्याणी कायमस्वरूपी अतिक्रमण करून बाजार वाडीची जागा घशात घातली आहे. नगरपंचायतच्या मालकीची जागा असूनही महसूल विभागाच्या हेलिपॅड मैदानावर बाजार भरविला जातो. पावसाळ्यात या मैदानावर चिखलाचे साम्राज्य आहे. नागरिकांना चिखलातून मार्ग काढीत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी लागते. दरम्यान कधीही चिखलात घसरून पडण्याची भीती ग्राहकांना असते. मजबुरी पोटी दुकानदार आणि ग्राहक नगरपंचायतच्या गलथान कारभाराचा मुका मार सहन करीत आहेत.या परिसरात आता तर चिखलासह घाणीचे साम्राज्य ही निर्माण झाले आहे. बाजारवाडीचे ठिकाणी स्वच्छतागृह,पिण्याचे पाणी आणि पथदिव्यांचा अभाव आहे.
आणखी वाचा-वर्धा: कारवाईचा बडगा! अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता काढली
नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र बाजार लिलाव करून मोकळे होणे एवढीच जबाबदारी नगरपंचायत बजावत आहे. नगरपंचायतींना शासनाकडून भरपूर निधी मिळते असा नागरिकांचा समज आहे.