अमरावती : स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महिमापूरच्या या विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्डवर झळकल्याने ही पायविहीर राष्ट्रीय नकाशावर आली आहे. राष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून केंद्रीय टपाल विभागाने या विहिरीचा अनोखा सन्मान केला आहे.
अमरावतीहून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आसेगाव पूर्णा ते दर्यापूर मार्गावर महिमापूर हे गाव आहे. याच गावात ही ऐतिहासिक विहीर आहे. संपूर्ण दगडाचे बांधकाम. चौकोनी आकार. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था. बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती, अशी या विहिरीची रचना आहे. ही विहीर मुघलकालीन असल्याचा उल्लेख अमरावती जिल्ह्याच्या ‘गॅझेटियर’मध्ये आहे. जमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती.
हेही वाचा – डॉ. मोहन भागवत म्हणतात सरकारकडे समस्या मांडेल, परंतु ते ऐकतील का हे माहीत नाही
हेही वाचा – अंबादेवी आणि एकवीरा देवीला ३ हजार किलोचा मेव्याचा नैवैद्य
केंद्रीय टपाल विभागाने भारतातील ऐतिहासिक अशा पायविहिरींचे निरीक्षण केले, त्यातून महाराष्ट्रातील आठ विहिरींचा समावेश टपाल पुस्तिकेत केला आहे. यात अमरावती, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक आणि परभणी जिल्ह्यातील चार अशा एकूण आठ विहिरींचा समावेश आहे. या पायविहिरींना बारव, बावडी, पुष्करणी, पोखरण, घोडेबाव, पोखरबाव अशा विविध नावांनी ओळखले जाते. अमरावती जिल्ह्यातील महिमापूरच्या विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्डवर प्रसिद्ध झाल्याने अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.