गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून येथील वस्तीतील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. हत्तींचा कळप याच परिसरात वास्तव्यास असल्याने पश्चिम बंगाल येथून आलेले सहा जणांचे हत्ती नियंत्रक पथक आणि वन विभागाची रेस्क्यू टीम याच परिसरात शुकवारी सकाळपासूनच तळ ठोकून आहेत.
हेही वाचा- शासनाकडून तीन वर्षांत जाहिरातींवर ३३३ कोटींचा खर्च
नागणडोह येथील घटनस्थळी सहायक उवनसंरक्षक दादा राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही़ पी. तेलंग, वनक्षेत्र सहायक एफ.सी. शेंडे, ए़.जी. माहुले यांनी भेट दिली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ वनविभागाने या गावकऱ्यांना चार-पाच दिवस गावात न जाण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, नागणडोह येथील वस्तीतील नागरिकांनी घरात मोहफुलांचा साठा करून ठेवला होता. या मोहामुळेच हत्तींनी वस्तीत प्रवेश करुन नासधूस केल्याची माहिती आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह परिसरात वास्तव्यास असलेला हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना वन विभागाने केल्या आहेत.